पालघर, २९ ऑगस्ट. गणरायाचे आगमन झाल्यापासून जिल्हाभर उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पसरले आहे. गल्लीबोळांमध्ये रोषणाई, ढोल-ताशांच्या गजरात साजरा होणारा उत्सव यावर्षीही रंगात आला आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील ९० गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही आगळीवेगळी संकल्पना राबवून सामाजिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला आहे.
विशेष म्हणजे वाडा तालुक्यातील ३५ गावांनी ही संकल्पना राबवली असून, तेथे उत्सवाला विशेषच रंगत आली आहे. बोईसर, सातपाटी, मनोर, तारापूर, वानगाव, विक्रमगड, तलासरी, कासा, जव्हार आणि मोखाडा या भागांतील अनेक गावांमध्ये देखील ही संकल्पना राबविली जात आहे.
यापूर्वी एकाच गावात अनेक मंडळांकडून स्वतंत्र गणेशोत्सव साजरे केले जात. यामुळे सजावट, वाजंत्री, प्रसाद, अन्नभोजन आदींसाठी स्वतंत्र खर्च होऊन गावात विभागणी आणि अनावश्यक वाद निर्माण होत असत. हे चित्र बदलण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही कल्पना पुढे आली. या उपक्रमामुळे गावातील ऐक्य वृद्धिंगत होत असून अनावश्यक खर्चालाही आळा बसत आहे.
गणेशोत्सवात फक्त धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचीही रेलचेल आहे. ग्रुप डान्स, सोलो डान्स, वेशभूषा स्पर्धा, बुद्धिबळ, कॅरम, महिलांसाठी संगीत खुर्ची, चमचा-गोटी यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सहभागी होण्याची संधी मिळत आहे.
दरम्यान, जिल्हाभरात पोलिसांच्या आकडेवारीनुसार १,९१२ सार्वजनिक आणि ९,७७६ खाजगी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. मात्र ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेमुळे गावोगावी सण एकत्र साजरा करण्याची संधी मिळून उत्सवाचे रूप अधिक भव्य आणि स्नेहपूर्ण झाले आहे.
सामाजिक सलोखा, शिस्तबद्ध आयोजन आणि ऐक्याची भावना वृद्धिंगत करणारी ही संकल्पना राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरत आहे.