मुंबई , 8 जुलै (हिं.स.)। हिंदी सक्तीच्या मुद्द्याने संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट राज्य सरकारवर टीका केली आहे. “या संपूर्ण गोंधळाला केवळ आणि केवळ गृह विभाग जबाबदार आहे. मुख्यमंत्री एकदा काही बोलतात, तर एकदा काहीतरी वेगळंच. हीच खरी समस्या आहे,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली .
सुळे पुढे म्हणाल्या, “मी समजत होते की, भारतीय जनता पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष आहे. मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसांतील त्यांची भाषा, वागणूक आणि धमक्यांची पद्धत पाहता, हे ना भाजपला शोभते ना लोकशाहीला.”
हिंदी-मराठी वादासंदर्भात त्या म्हणाल्या, “तिसऱ्या भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार म्हणतात आम्ही नाही केली, शिंदे गट म्हणतो आम्ही नाही केली, मग केली कुणी? भाजपनेच ही सक्ती लादली आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. “आम्ही हिंदीच्या विरोधात नाही, आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. पण भाषेची सक्ती चालणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याविरोधात मनसे, उद्धव ठाकरे गट, मराठी एकीकरण समिती आदी संघटनांनी प्रतिउत्तर म्हणून मोर्चा पुकारला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आणि नेतृत्वकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्षाला तोंड फुटले.
मोठ्या पोलिस बंदोबस्तातही मराठी माणसांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर येत मोर्चा काढला. यानंतर मंत्री प्रताप सरनाईकही मोर्चा स्थळी दाखल झाले, मात्र त्यांच्याही उपस्थितीवर काही ठिकाणी विरोध झाल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर सुळे यांनी सरकारला जाब विचारत भाजपवर व गृहविभागावर गंभीर आरोप केले आहेत.
