कोलकाता : मृत व्यक्तीच्या वीर्यावर म्हणजेच शुक्राणुंवर त्याच्या पत्नीचा अधिकार असावा की पित्याचा? असा प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयासमोर दाखल झाला होता. या प्रकरणात निर्णय देताना उच्च न्यायालयानं मृत व्यक्तीच्या वीर्यावर केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार असू शकतो, असा निर्वाळा दिला आहे.
मृत व्यक्तीच्या पित्याकडून उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती. दिल्लीच्या एका ‘स्पर्म बँके’त स्टोअर करण्यात आलेल्या मृताचे वीर्यवर त्याच्या विधवा पत्नीचाच हक्क असल्याचा निर्वाळा या याचिकेवर उच्च न्यायालयानं दिला आहे. मृताच्या पित्यानं मार्च २०२० मध्ये एक याचिका दाखल केली होती.
मृत पतीच्या शुक्राणूंवर फक्त आणि फक्त त्याच्या पत्नीचाच हक्क असू शकतो. आई वडिल त्यावर दावा करू शकत नाही, असा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. वडिलांनी मुलाच्या शुक्राणूंचा ताबा मिळावा यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावत सुनेच्या बाजुने निर्णय दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मूळचा पश्चिम बंगालचा असलेल्या सुनील (नाव बदलले आहे) याने दिल्ली विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळवली होती. तो थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त होता. दिल्लीत उपचार घेत असतानाच त्याने त्याचे शुक्राणू फ्रिज केले होते. त्यानंतर त्याने दिल्लीतीलच एका तरुणीशी लग्न केले होते. त्यानंतर 2018 साली ते दोघे पश्चिम मिदनापूरला स्थायिक झाले.
मात्र शिफ्टिंगच्या काही दिवसानंतरच सुनीलचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनीलच्या वडिलांनी 2019 मध्ये त्याचे शुक्राणू ज्या ठिकाणी ठेवले होते. त्या बँकेला संपर्क साधून ते शुक्राणू मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बँकेने ते शुक्राणू फक्त पत्नीलाच दिले जाऊ शकतात, असे सांगतिले.
त्यामुळे हताश झालेल्या वडिलांनी नंतर सुनेशी संपर्क साधत ते स्पर्म मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सुनेने देखील नकार दिला. त्यामुळे त्या वडिलांनी सुनेविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ‘मला भीती वाटते की माझ्या मुलाचे शुक्राणू न वापरता वाया जातील. किंवा जर बँकेशी असलेला करार संपला असेल ते शुक्राणू फेकून देतील. जर असे झाले तर आमचा वंश पुढे वाढणार नाही’, असे त्या वडिलांनी याचिकेत म्हटले आहे.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सब्यासाची भट्टाचार्य यांनी त्या शुक्राणूवर फक्त पत्नीचाच हक्क असल्याचे सांगितले आहे. ‘शुक्राणू ज्या व्यक्तीचे आहेत त्याचे निधन झाले तेव्हा तो विवाहीत होता. त्यामुळे त्याच्या शुक्राणूंवर फक्त त्याच्या पत्नीचा हक्क आहे. त्याव्यतिरिक्त कुणीही त्यावर आपला हक्क सांगू शकत नाही’, असे न्यायालयाने सांगितले आहे.