बंगळुरू, 9 ऑगस्ट –
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने सहा पाकिस्तानी विमाने पाडल्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी जाहीर केले. यामध्ये पाच लढाऊ विमाने आणि एक गुप्तचर विमान (AWACS)चा समावेश आहे. हे विधान पाकिस्तानला झालेल्या नुकसानीबाबत भारतीय हवाई दलाचे पहिले अधिकृत वक्तव्य मानले जात आहे.
बंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एअर चीफ मार्शल सिंह यांनी सांगितले की, या यशाचे श्रेय S-400 हवाई संरक्षण प्रणालीला जाते. त्यांनी मुरीदकेतील लष्कर मुख्यालयावर हल्ल्यापूर्वी आणि नंतरचे फोटो सादर करत, हे ठिकाण पाकिस्तानच्या वरिष्ठ नेतृत्वाचे निवासी व कार्यालयीन ठिकाण असल्याचे सांगितले. हल्ल्यानंतर बहावलपूरमधील जैश मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आजूबाजूची इमारती सुरक्षित राहिल्या.
त्यांनी पुढे सांगितले की, एक मोठे विमान सुमारे 300 किलोमीटर अंतरावरून पाडण्यात आले. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जमिनीवरून हवाई हल्ला असल्याचा दावा त्यांनी केला. शाहबाज जेकबाबाद विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका एफ-16 हँगरचा अर्धा भाग उद्ध्वस्त झाला, तसेच हँगरमधील काही विमाने खराब झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
याशिवाय, मुरीदके आणि चकलाला येथील किमान दोन कमांड अँड कंट्रोल सेंटरवर हल्ला करून सहा रडार नष्ट करण्यात आले. तसेच, एईडब्ल्यू अँड सी हँगरमध्ये किमान एक एईडब्ल्यू अँड सी आणि काही एफ-16 विमाने असल्याचे संकेत मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.