नवी दिल्ली , 19 जून (हिं.स.) : ऑपरेशन सिंदूर अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे किंवा व्यापार कराराच्या प्रस्तावामुळे नव्हे तर पाकिस्तानच्या विनंतीवरून तूर्त थांबविले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठामपणे सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये बुधवारी (दि.१८) दूरध्वनीवरून सुमारे ३५ मिनिटे संभाषण झाले. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली, असा दावा ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. यासंदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, भारताने तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारण्यास कधीही मान्यता दिलेली नाही.
दरम्यान, बुधवारी (दि.१८)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी थांबवले या दाव्याचा पुनरुच्चार केला.ट्रम्प म्हणाले की, “मला पाकिस्तान आवडतो, पण मला वाटते की, मोदी एक अद्भुत महान व्यक्ती आहेत.” ते पुढे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यात पाकिस्तानच्या वतीने असीम मुनीर यांनी, तर भारताच्या वतीने पंतप्रधान मोदी यांनी खूप प्रभावी भूमिका बजावली. “दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्रे आहेत, मी दोन्ही अण्वस्त्रधारी देशांना लढण्यापासून रोखले,” असे ट्रम्प यांनी नमूद केले.तसेच भारत-अमेरिकेत व्यापार करार लवकरच होईल असेही त्यांनी सांगितले.