मुंबई, १२ जून, (हिं.स.) : मान्सूनने यंदा महाराष्ट्रात वेळेआधीच हजेरी लावली असली तरी सुरुवातीला काही काळ तो थांबलेला दिसला. मात्र, आता पुढील काही दिवसांत राज्यात मान्सून जोरदार सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ३० जूनपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. यातील पहिल्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात मध्य राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. एकंदरीत, पुढील तीन आठवड्यांत देशभरात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात पावसाचे प्रमाण ३२ टक्के कमी आहे. मात्र, जून अखेरीस हे प्रमाण १०८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. युरोपियन व भारतीय हवामान मॉडेलनुसार, पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढणार असून काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हानिहाय यादी
गुरुवार : अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, कोल्हापूर
शुक्रवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
शनिवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
रविवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पावसाचा जोर पाहता प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दरड कोसळणे, पूरस्थिती आणि विजेच्या कडकडाटाची शक्यता असल्याने काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.