नवी दिल्ली, ५ ऑगस्ट – जम्मू-कश्मीर, गोवा, बिहार आणि मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी १.१० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या खाजगी सचिव के.एस. राणा यांनी दिली. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक स्पष्टवक्ते आणि प्रभावी नेतृत्व हरपले आहे.
सत्यपाल मलिक हे नेहमीच शेतकरी आंदोलन, भ्रष्टाचार आणि विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर आपली परखड मतं मांडत चर्चेत राहिले. कलम ३७० आणि अनुच्छेद ३५अ हटवले गेले, त्यावेळी जम्मू-कश्मीरचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत होते. जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर त्याचे पहिले उपराज्यपाल म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.
२४ जुलै १९४६ रोजी उत्तर प्रदेशातील बागपत येथे त्यांचा जन्म झाला. मेरठ विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि कायद्याची पदवी (एलएलबी) त्यांनी घेतली. विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रीय सहभाग असलेल्या मलिक यांची १९६८-६९ मध्ये विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. १९७४ मध्ये ते प्रथमच विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले.
१९८०-८६ व १९८६-८९ या कालावधीत त्यांनी राज्यसभेचे प्रतिनिधित्व केले. १९८९ ते १९९१ या काळात ते जनता दलाच्या तिकिटावर अलीगडमधून ९वी लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. २०१२ मध्ये त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी भाजपाव्यतिरिक्त अनेक पक्षांत कार्य केलं – ज्यात भारतीय क्रांती दल, जनता दल, काँग्रेस, लोकदल आणि समाजवादी पक्षाचा समावेश आहे.
त्यांनी सप्टेंबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान बिहारचे राज्यपाल, मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान ओडिशाचे प्रभारी राज्यपाल, ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू-कश्मीरचे राज्यपाल, नोव्हेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० दरम्यान गोव्याचे राज्यपाल आणि ऑगस्ट २०२० ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत मेघालयचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडली.