वॉशिंग्टन, 14 मे (हिं.स.)।ऑस्कर विजेते हॉलीवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाला आहे. ते ९२ वर्षांचे होते. रॉबर्ट बेंटन यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा जॉन बेंटन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. लोकं रॉबर्ट यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.
रॉबर्ट बेंटन यांना ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ या चित्रपटाद्वारे लेखक आणि दिग्दर्शकाची खरी ओळख मिळाली. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी लेखन आणि दिग्दर्शन तसेच निर्माते या तिन्ही भूमिका बजावल्या आहेत. तसेच त्यांची कारकीर्द सहा दशकांची राहिली असून यादरम्यान त्यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपट देखील केले.रॉबर्ट बेंटनचा ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ हा चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने केवळ सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब जिंकला नाही तर पाच ऑस्कर पुरस्कारही जिंकले आहेत. चित्रपटातील डस्टिन हॉफमन आणि मेरिल स्ट्रीप यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने सिनेइंडस्ट्रीत ओळख मिळाली.
त्यांनी आपल्या फिल्मी करिअरकडे पुन्हा मागे वळून पाहिले नाही. १९८४ मध्ये, ‘प्लेसेस इन द हार्ट’ या चित्रपटाला रॉबर्ट बेंटन यांनी ऑस्कर पुरस्कार जिंकला. हा चित्रपट बेंटनने त्यांच्या आईला श्रद्धांजली म्हणून बनवला होता. त्यांच्या चित्रपटांमध्ये ‘ट्वायलाइट’, ‘द ह्यूमन स्टेन’ आणि ‘बिली बाथगेट’ या चित्रपटांचाही समावेश होतो.