नवी दिल्ली, ३० जुलै – जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) नवीन अहवालात मोठा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार, हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या समर्थनाशिवाय शक्यच नव्हता.
टीआरएफने घेतली जबाबदारी, नंतर माघार
संयुक्त राष्ट्रांच्या ISIL व अल-कायदा निगराणी समितीने सादर केलेल्या ३६व्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानातून कार्यरत असलेला ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या गटाने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी दोनदा घेतली होती. त्यांनी हल्ल्याच्या दिवशी घटनास्थळाचा फोटोही प्रसारित केला होता. मात्र, २६ एप्रिल रोजी त्यांनी अचानक ही जबाबदारी परत घेतली, आणि त्यानंतर TRF कडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
टीआरएफ आणि लष्कर-ए-तैयबा यांच्यात थेट संबंध
अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की टीआरएफ आणि लष्कर-ए-तैयबा यांच्यात थेट संबंध आहेत, आणि या हल्ल्यासाठी लष्करचा पाठिंबा अत्यावश्यक होता. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने TRF ला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अमेरिकेने याच महिन्यात TRF वर अधिकृत बंदी लागू केली.
हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू
या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी २५ भारतीय तर १ नेपाळचा नागरिक होता. पाच दहशतवाद्यांनी पहलगाम या पर्यटनस्थळी हल्ला केला होता, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.
भारताची ठोस कारवाई : ऑपरेशन सिंदूर
हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित करून कारवाई केली होती. ही मोहीम भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेचा भाग होती.