नवी दिल्ली – २८ जुलै रोजी ऑपरेशन महादेवमध्ये ठार करण्यात आलेले तीन दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या जवळून पाकिस्तानी मतदार ओळखपत्रे, बायोमेट्रिक रेकॉर्ड आणि इतर ठोस पुरावे मिळाले आहेत. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती पुष्टी केली.
अधिकाऱ्यांच्या मते, मिळालेल्या पुराव्यांमध्ये —
-
पाकिस्तानी मतदार ओळखपत्र
-
सॅटेलाइट फोन आणि जीपीएस डेटा
-
पाकिस्तानमध्ये बनवलेले चॉकलेट रॅपर्स (मे २०२४ मध्ये मुझफ्फराबाद, पीओके येथून पाठवलेले)
-
गोळ्यांचे खोके (जप्त रायफल्सशी जुळणारे)
-
रक्ताचे डीएनए नमुने (दहशतवाद्यांच्या डीएनएशी जुळणारे)
या पुराव्यांवरून ते पाकिस्तानी नागरिक असल्याचे सिद्ध झाले आहे. पहलगाम हल्ल्यातील त्यांची खरी नावे सुलेमान शाह, अबू हमजा आणि यासिर असून, हे लष्कर-ए-तोयबाचे वरिष्ठ कमांडर होते. ते हल्ल्यानंतर दाचीगाम-हरवान जंगलात लपून बसले होते. या हल्ल्यात कोणताही स्थानिक काश्मिरी सहभागी नव्हता.
दहशतवाद्यांकडून अमेरिकन एम४ कार्बाइन, एके-४७, १७ रायफल्स आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले.
२९ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत माहिती देत सांगितले की, पहलगामच्या बैसरन खोऱ्यात २६ पर्यटकांचा बळी घेणाऱ्या या तिघांना भारतीय सुरक्षा दलांनी २८ जुलै रोजी ठार केले. त्यांच्या ओळखीमध्ये पाकिस्तानी मतदार कार्ड आणि चॉकलेट रॅपर्स यांचा मोठा वाटा होता.