काश्मीर, २३ मे (हिं.स.) : काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात धर्म विचारून २६ भारतीय पर्यटकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी तपासात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण जगातून प्रतिक्रिया उमटल्या. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ६ व ७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत प्रत्युत्तर दिले.
पाच दहशतवादी हल्ल्यात सामील होते, यातील तीन पाकिस्तानी आहेत. त्यांच्यावर २० लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले असून एनआयएसह सर्व तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत आहे. सध्या शेकडो स्थानिकांची चौकशी झाली असून अद्याप आरोपी फरार आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर तिथले पोलीस, सुरक्षा दल सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, या हल्ल्याचा सुगावा लावणे आणि भविष्यातील हिंसाचार थांबवणे व ह्यापुढे असे हल्ले सहन करणार नाही ही मुख्य उद्दिष्ट असून सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.