श्रीनगर , 7 मे (हिं.स.)।पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय हद्दीतील गावांना लक्ष्य करत अंदाधूंद गोळीबार केला. यात तब्बल ७ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पहलगाम हल्ल्यापासूनच पाकिस्तानच्या लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला जात आहे.आता ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानी लष्कराने जम्मू आणि काश्मिरातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या गावांना लक्ष्य करत उखळी तोफा डागण्यात आल्या. घरांवर गोळीबार करण्यात आला.
पाकिस्तानकडून अचानक करण्यात आलेल्या या गोळीबारामध्ये सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जम्मूतील पुंछ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात २५ नागरिक जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने भारतीय हद्दीतील चौक्यांना आणि गावांना लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे पालन करावे, असे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला सांगण्यात आले आहे. यासंदर्भात एक लष्करी पातळीवर बैठकही झाली आहे. पण, पाकिस्तानकडून शस्त्रसंधी न पाळता गोळीबार सुरूच आहे. बुधवारी (दि.७) पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले.