इस्लामाबाद, 8 ऑक्टोबर। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सध्या खूपच वाढलेला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशात युद्धाचे संकेत दिले आहेत. “जर या वेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल,” अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली आहे. ख्वाजा आसिफ यांनी याआधीही बऱ्याचदा वादग्रस्त विधाने केली आहेत. भारतीय हवाई दलाबद्दलही त्यांनी गरळ ओकली होती.
पाकिस्तानी न्यूज चॅनलशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले, “जर तुम्ही इतिहासाकडे पाहिलं, तर हिंदुस्थान केवळ एकदाच एकसंध राज्य होता, ते म्हणजे औरंगजेबाच्या काळात, १८व्या शतकात. भारत कधीच एक देश नव्हता. कधीतरी ५४० रियासती होत्या. आम्ही तर अल्लाहच्या नावावर देश बनवला आहे.”
तसेच त्यांनी असेही म्हटले, “वरून खालपर्यंत आपल्यात किती भांडणे सुरू आहेत. उत्तर ते दक्षिणेपर्यंत हेच सुरू आहे. या गोष्टींचा प्रभाव पडतो. पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती बनत असल्याचं मला वाटते. पण यावेळी युद्ध झाले तर अल्लाह आपल्याला आधीपेक्षाही जास्त मोठा विजय मिळवून देईल.”
ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच भारतीय वायुसेनेविरोधातही खालच्या पातळीवर टीका केली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला आहे.