लाहोर , 23 एप्रिल (हिं.स.)।जम्मू काश्मीरच्या पहलागमजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केलं.तसंच, पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा आरोप त्यांनी भारतावर केला आहे. सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी आसिफ यांनी हल्ल्याची जबाबदारी फेटाळून लावताना या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरलं आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “पाकिस्तानचा या दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नाही. (भारतातील) देशातील लोकांचाच यात समावेश आहे. भारतातील अनेक राज्यांत सरकारविरोधात रोष आहे. तिथे नागालँडपासून काश्मीर आणि साऊथमध्ये छत्तीसगड, मणिपूरमध्ये लोक सरकारविरोधात आहेत. भारत सरकार लोकांच्या हक्कांवर गदा आणत आहे. त्यांचं शोषण करत आहे. अल्पसंख्यांकांचं शोषण होत आहे. याविरोधात लोक उभे राहिले आहेत. आमचा याच्याशी काही संबंध नाही. आम्ही दहशतवादी कृत्यांचं समर्थन करत नाही. कोणत्याही स्थानिक संघर्षात निष्पाप लोकांना लक्ष्य करू नये”, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आपल्या राष्ट्रीय धोरणात सामान्य लोकांना लक्ष्य करण्याची परवानगी नाही यात शंका नाही, परंतु जर लष्कर किंवा पोलिस भारतात सामान्य माणशांवर शस्त्रे उचलत असतील तर पाकिस्तानला दोष देणे सोपे आहे.””आमच्याकडे जवळजवळ दररोज असे पुरावे गोळा होतात जे आम्ही दिले आहेत. एकदा नाही तर अनेक वेळा दिलेत की भारत बलुचिस्तान आणि पाकिस्तानच्या इतर भागात अशांततेला प्रोत्साहन देत आहे. ते अफगाणिस्तानात किंवा इतर कुठूनही पाकिस्तानात अशांतता पसरवत आहे, याचा मोठा इतिहास आहे”, असंही ते म्हणाले. दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.