इस्लामाबाद, 8 ऑक्टोबर। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) ने पाकिस्तानी लष्करावर बुधवारी (दि.८) मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ११ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले, तसेच अनेक सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये एक लेफ्टनंट कर्नल आणि एक मेजर अश्या दोन अधिकारी यांचा समावेश आहे.
अफगाण सीमेजवळ झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी टीटीपी या संघटनेने स्वीकारली आहे. माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कर अफगाणिस्तान सीमेवर टीटीपी विरोधात ऑपरेशन चालवत होते. याच दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये चकमक झाली. या चकमकीत टीटीपीचे १९ दहशतवादीही ठार झाले आहेत. टीटीपी लढवय्यांनी पूर्वनियोजित घात लावून हा हल्ला केला. उत्तर-पश्चिम कुर्रम जिल्ह्यात, त्यांनी सुरुवातीला रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट घडवून आणले आणि त्यानंतर गोळीबार सुरू केला.
पाकिस्तानी लष्कराने नंतर एका अधिकृत निवेदनात सांगितले की, या ऑपरेशनदरम्यान काही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल जुनैद आरिफ (वय ३९) आणि मेजर तय्यब रहत (वय ३३) यांना शहादत प्राप्त झाली. लेफ्टनंट कर्नल आरिफ हे या मोहिमेचे नेतृत्व करत होते. मेजर तय्यब त्यांच्यासोबत मोहिमेत सहभागी होते.
पाकिस्तानी नेते बिलाल आफ्रिदी यांनीही एक्सवर एक पोस्ट शेअर करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी लिहिले, “लेफ्टनंट कर्नल जुनैद आरिफ (३९) आणि मेजर तय्यब रहत (३३) यांनी ९ इतर शूर सैनिकांसोबत शहादत प्राप्त केली.”
टीटीपी ही संघटना पाकिस्तान सरकार पाडून एक कठोर इस्लामी राजवट स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की, हे दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतात आणि मग पाकिस्तानमध्ये घातपाती हल्ले करतात. तथापि, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार वारंवार या आरोपांचा विरोध करत आले आहे.