इस्लामाबाद, 12 ऑगस्ट – पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला चेतावणी दिली आहे की, जर भारताने सिंधू जल करार स्थगित करून नदीवर धरण उभारले, तर पाकिस्तान पुन्हा युद्ध पुकारेल. त्यांनी पाकिस्तानच्या जनतेने या संघर्षात समर्थन द्यावे, असे आवाहन केले.
सिंध सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या कार्यक्रमात बोलताना भुट्टो म्हणाले की, “भारत सिंधू कराराचे पालन करत नसेल, तर तो आमच्या इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेवर हल्ला आहे.” त्यांनी आरोप केला की भारताची जलनीती आक्रमक आहे आणि पाकिस्तानला पाण्यापासून वंचित करण्याचा प्रयत्न करत आहे. युद्धाची वेळ आली तर पाकिस्तानातील जनता भारताचा सामना करू शकते आणि आपल्या सहा नद्यांचा ताबा परत घेऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी अमेरिकेतील टॅम्पा येथे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भविष्यात युद्ध झाल्यास आणि देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास अणुहल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यांनी इशारा दिला की, भारताने पाकिस्तानकडे येणारा जलप्रवाह अडवण्याचा प्रयत्न केल्यास, इस्लामाबाद भारताच्या पायाभूत सुविधांचा नाश करेल. “आम्ही अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटले की आम्ही नष्ट होणार आहोत, तर आम्ही अर्ध्या जगालाही आपल्या सोबत विनाशाच्या मार्गावर घेऊन जाऊ,” असे मुनीर यांनी म्हटले.
भारताने या धमक्यांना कठोर प्रतिसाद देत म्हटले की, अणु हल्ल्याची धमकी देणे हे पाकिस्तानची सवय बनली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, भारत कोणत्याही अणु धमकीसमोर झुकणार नाही आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. तसेच अशा गैरजिम्मेदार विधानांमुळे पाकिस्तानच्या अणु कमांड व नियंत्रण यंत्रणेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, जिथे लष्कराचे संबंध दहशतवादी संघटनांशी आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानची लष्करशाही अमेरिकेकडून थोडीशी साथ मिळाली की आपला आक्रमक चेहरा दाखवते. यावरून पाकिस्तानमध्ये लोकशाही कमकुवत असून प्रत्यक्ष सत्ता लष्कराच्या हाती असल्याचे स्पष्ट होते. भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला असून, त्याने प्रत्युत्तरात भारतावर तथ्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.