जयपूर , 22 मे (हिं.स.) – ज्यांनी हिंदुस्तानचे रक्त सांडले; आज त्यांचा हिशोब चुकता झाला. भारत गप्प राहील असं ज्यांना वाटत होते ते आज त्यांच्या घरात लपून बसले आहेत. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा गर्व होता ते आज त्याच्याच ढिगाऱ्यात गाडले गेले आहेत. आता भारताची भूमिका स्पष्ट आहे, प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत पाकिस्तानचे सैन्य, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी(दि.२२) केला.
ते राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी आज देशनोके येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’वर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. ”जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते; त्यांना मातीत गाडण्यात आले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘ज्यांनी हिंदुस्तानचे रक्त सांडले; आज त्यांचा हिशोब चुकता झाला. भारत गप्प राहील अस ज्यांना वाटत होते ते आज त्यांच्या घरात लपून बसले आहेत. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा गर्व होता ते आज त्याच्याच ढिगाऱ्यात गाडले गेले आहेत.” असा शब्दांत पीएम मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले. आता भारताची भूमिका स्पष्ट आहे…प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत पाकिस्तानचे सैन्य, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल.” असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.
यावेळी पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तान एक गोष्ट विसरला आहे की आता भारतमातेचा सेवक मोदी येथे ताठ मानेने उभा आहे. मोदींचे चित्त शांत आहे, ते शांतच राहते, पण मोदींचे रक्त सळसळते आहे. आता मोदींच्या धमन्यांमध्ये रक्त नाही, तर लखलखता सिंदूर वाहत आहे.
