नवी दिल्ली , 24 एप्रिल (हिं.स.)। पाकिस्तानसोबत वाढत्या तणावामुळे आणि अलिकडच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे, इथून पुढे आता पाकिस्तानी कलाकारांचा कोणताही आशय भारतात प्रसारित किंवा प्रदर्शित होऊ दिला जाणार नसल्याचं सरकारने म्हटलं आहे. यात आता पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूरचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ अडचणीत सापडला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूरचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, अबीर गुलाल हा चित्रपट आता भारतात प्रदर्शितच होऊ दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.सध्याच्या राजनैतिक आणि सुरक्षा वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल फवादने सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘पहलगाममधील हल्ल्याची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं आहे. या घटनेतील मृतांसोबत आमच्या संवेदना आहेत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी म्हणून आम्ही प्रार्थना करू” अशी प्रतिक्रिया फवादने त्याच्या सोशल मीडियावर पोस्टद्वारे केली होती.
अबीर गुलाल’ हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. पण या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला कास्ट केल्याबद्दल चित्रपट निर्मात्यांवर जोरदार टीका होत आहे. मनसेनं महाराष्ट्रात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुरुवातीलाच विरोध केला होता. हा पक्ष बऱ्याच काळापासून पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास विरोध करत आहे. पक्षाने सिनेमागृह मालकांना इशाराही दिला. पण आता जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर तर संपूर्ण देशातच आता या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
‘अबीर गुलाल’ हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये फवाद खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट काही महोत्सवांमध्ये दाखवण्यात येणार होता.2016 मध्ये उरी हल्ल्यानंतरही भारतात पाकिस्तानी कलाकारांवर अनौपचारिक बंदी घालण्यात आली होती. अनेक संघटना आणि चित्रपट संघटनांनी अशा चित्रपटांविरुद्ध आवाज उठवला होता. फवाद खानसारखे पाकिस्तानी स्टार यापूर्वी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले आहेत, परंतु पहलगाममधील हल्ल्यानंतर आता वातावरण आणखीनच बदलले आहे.
—————