सोलापूर, 21 मार्च (हिं.स.) :
सांगोल्यातील उदनवाडी येथील बिरूदेव नामदेव पांढरे हा कोहीमा नागालॅण्ड येथे सैन्यात कार्यरत होता. त्याचा संसार सुखाचा सुरू होता, पण पहिल्याच मुलाच्या बारशाला सुट्टी काढून गावी आलेल्या बिरूदेवने आठ एकर जमिनीच्या वादातून चुलत भाऊ दत्तात्रय पांढरे व त्यांचे भाऊ जयवंत व अर्जुन यांच्यावर बंदूक चालवली. त्यात ते बचावल्याने, पण बिरूदेवने बंदुकीत भरलेल्या दुसऱ्या बारने चुलत भावजय उज्वला पांढरे यांचा जीव घेतला. या गुन्ह्यात बिरुदेवला पंढरपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.उदनवाडी (ता. सांगोला) येथील प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांच्याकडील सगळीच जमीन आरोपी बिरूदेवला घ्यायची होती.
त्यातून त्याने बालपणी एकमेकांच्या अंगाखांद्यावर बागडलेल्या चुलत्यांवर व चुलत भावांवरच बंदूक चालवली. चुलत भाऊ दत्तात्रय, जयवंत व अर्जुन यांनी देशपांडे यांची आठ एकर जमीन विकत घेतल्याचा राग बिरुदेवच्या मनात होता. त्यासाठी दोघांनीही एकमेकांविरूद्ध सांगोला कोर्टात दिवाणी दावे दाखल केले होते. तरीपण, बिरुदेवचा हव्यास संपला नव्हता. बिरुदेव सैन्यात असल्याने त्याच्याकडे दोन बोअरची बंदूक होती. मुलाच्या बारशाला आलेल्या बिरुदेवच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाही १९ जुलै २०१४ सकाळी फिर्यादी दत्तात्रय पांढरे व त्यांचे भाऊ, भावजय शेतात गेल्यावर बिरूदेवसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी चुलत भावांना लोखंडी पाईप, काठ्यांनी मारहाण केली.—————