परभणी, 2 ऑगस्ट – थोर साहित्यिक, क्रांतीकारक विचारवंत आणि बहुजन समाजाचे प्रवक्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त परभणीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन सोहळ्यात भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने एक समाजप्रबोधनपर आणि साहित्यिक उपक्रम राबवण्यात आला. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे लिखित प्रसिद्ध कादंबरी ‘फकीरा’च्या 105 प्रती नागरिकांना मोफत वाटप करण्यात आल्या.
सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ‘फकीरा’ या पात्राच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी समाजपरिवर्तनाचा संदेश दिला. अशा प्रेरणादायी साहित्याचे वाचन नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या वतीने राबवलेला हा उपक्रम नागरिकांनी स्वागतार्ह मानला. कार्यक्रमाची सांगता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि विचारांचा जागर नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या संकल्पाने करण्यात आली.