खास प्रतिनिधी
सोलापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र येण्याच्या चर्चेचे वादळ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चांगलेच घोंगावू लागले आहे. पवार काका-पुतण्या यांच्यामध्ये जवळीकदेखील निर्माण होत आहे. अशात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार या उभतांमध्ये काल बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे खुद्द शरद पवार आणि अजित पवार हे दोघेदेखील एकत्र होते. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार प्रसंगी पुन्हा एकत्र येऊ शकतात, या प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडीला बळकटी येत आहे.
विशेष म्हणजे सध्या वातावरणामधील गरमी प्रचंड वाढत आहे. वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच बारामतीकर काका-पुतण्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामधील जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला ‘परिवर्तना’ची जोरदार ऊब मिळेल, असा राजकीय जाणकरांनादेखील वाटू लागले आहे. शिवाय शरद पवार अन् अजितदादा एकत्र येण्याचे महाराष्ट्रावर अवकाळी ढग आल्याची दुसर्या बाजूने विरोधात चर्चा आहे.
जयंत पाटलांची अपरिहार्यता म्हणून…
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याची सुक्ष्म चाचपणी केली. या पक्षात सध्या तरी त्यांना देण्याइतपत मोठं तोलामापाचे पद नाही. शिवाय मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द पाळला जाईल, असा या पक्षाच्याबाबतीत त्यांना वाटत नाही. शिवाय सत्तेत नसण्याची हवा त्यांनी मानवत नाही. त्यामुळे जयंत पाटील यांची अपरिहार्यता आहे. अजित पवार गटात जाऊन काही सकारात्मक होईल, या खात्रीनेच ते शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत, यासाठी मध्यस्ती करत असतील, असं राजकीय विश्लेषकांना आता वाटू लागले आहे.
शरद पवारांच्या भेटीवर अजित पवार स्पष्टच बोलले… अर्थसंकल्पात कृषी उत्पादन वाढीसाठी केलेल्या तरतुदीसंदर्भात त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्या निमित्ताने शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली. त्यासंदर्भात माध्यमांनी काय बातम्या लावाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहुन बातम्या द्या, असे अजित पवार म्हणाले.आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो, आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होतो आहे. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे. एआयचा वापर करुन ऊसाचे उत्पादन वाढले आहे.
आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखाल करणार आहोत.आजची नेहमीप्रमाणे आमची बैठक होती. या नियामक मंडळात जयंत पाटलांसह अनेक जण आहेत. त्यांनी काही मिटिंग घेतल्या होत्या. एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात मी अर्थसंकल्पात सांगितलं होतं. त्याकरता 500 कोटींची तरतूद केल्याचंही जाहीर केलं होतं. यावर जयंत पाटलांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. दोन बैठकांमध्ये थोडावेळ होता, म्हणून ती बैठक घेतली. आम्ही नेहमीप्रमाणे जनरल बॉडीला, नियामक मंडळाला येत असतो, काही कमिटीला येत असतो. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून कृषी उत्पादन कसं वाढेल, यासंदर्भातच आज चर्चा झाली. यातून टनेज कसं वाढेल यावर चर्चा झाली. प्रायोगिक तत्वावर केलेल्या कामामुळे टनेज वाढल्याचं लक्षात आलंय. सोयाबीन, कापूससारख्या पिकांसाठी एआयचा वापर करणं काळाची गरज आहे, या बाबी कृषी खात्याने आणि सरकारने मनावर घेतलं आहे, अशी माहिती देखील अजित पवारांनी यावेळी दिली आहे
छगन भुजबळ म्हणाले, चर्चा केली तर काय बिघडलं?
अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बंद दाराआडील चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही चर्चा कतो. आव्हाडही माझ्या बाजूलाच असतात. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडले? आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत. त्यांची मते वेगळी आहेत, आमची वेगळी आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं.पवार काका-पुतण्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, संदर्भात पंचांग वगैरे बघतो. मी आता जळगावमध्ये आलो आहे. इथं चांगले ज्योतिषी आहेत. त्यांना विचारतो, असं होईल का? असा प्रश्न करतो, असे भुजबळ यांनी म्हटलं आहे.
