प्रतिनिधी:
करमाळा
करमाळा शहरानजीकच्या दिगंबर रावजी बागल पेट्रोल पंपा समोर पिक अप आणि कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
करमाळा शहरातील शिवाजीनगर भागातील लिंबाजी अज्ञान पेठे (वय-५९)आणि सिंधुबाई लिंबाजी पेठे (वय-४८) हे दांपत्य बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या सफारी क्र. एम एच ४५ ए यु ५९५९ या चारचाकी कारमध्ये दिगंबररावजी बागल पंपावरून इंधन भरून पंपाच्या डाव्या बाजूने बाहेर निघाले असताना करमाळा शहराकडून जेऊरच्या दिशेने भरधाव निघालेल्या पिक अप क्र. एम एच ४५ टी ३४९३ या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेमुळे सफारी कार उलटली असली तरी या कारमधील एअर बॅग्जमुळे पेठे दाम्पत्य बालंबाल बचावले आहेत.
अपघातानंतर पंपावरील कर्मचाऱ्यांसह जवळच्या पंक्चर दुकानातील युवकांनी तातडीने अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले आणि धीर दिला. या अपघातामुळे घटनास्थळावर बघ्यांचीही मोठी गर्दी झाली. अपघाताचे वृत्त समजताच करमाळा पोलिसांतील वाहतूक पोलीस पो.कॉ. दिपक कांबळे, पो.कॉ. मयुर कदम, पो.ह. सचिन हिंगमिरे, अपघात पथकाचे अंमलदार सतीश एनगुले आणि पोलिस चालक मेजर आनंद पवार यांनी घटनास्थळावर त्वरित धाव घेतली. गर्दीला बाजूला करून दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्यातून बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू आहे.