लंडन, 24 जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ऐतिहासिक युनायटेड किंग्डम दौऱ्यावर बुधवारी लंडनला दाखल झाले. एका दिवसाच्या या दौऱ्यात, मोदी यांची ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्यासोबत महत्वाची भेट होणार आहे. या भेटीत भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी होण्याची शक्यता असून, हा करार दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.
या करारानुसार, ब्रिटनमध्ये जाणाऱ्या ९९ टक्के भारतीय निर्यातीवरील कर समाप्त केला जाईल. यामध्ये कापड, चामडे, रत्ने- दागिने, ऑटो पार्ट्स आणि इंजिन यांसारख्या प्रमुख उद्योगांचा समावेश आहे. त्याच वेळी, भारत ब्रिटनमधून येणाऱ्या वैद्यकीय उपकरणे, मद्यविषयक पेये आणि इतर ९० टक्के वस्तूंवरील शुल्क कमी किंवा रद्द करेल.
ब्रिटिश सरकारच्या अंदाजानुसार, या करारामुळे २०४० पर्यंत दरवर्षी २५.५ अब्ज पाउंड इतका व्यापारवाढीचा अंदाज आहे. तसेच, यूकेतील २६ पेक्षा अधिक कंपन्यांनी भारतात नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये एअरबस आणि रोल्स-रॉईस यांसारख्या कंपन्या भारतातील प्रमुख विमान कंपन्यांना नवीन विमानांचा पुरवठा करतील. रोल्स-रॉईस इंजिन्स हे विमानांपैकी अर्ध्याहून अधिक विमानांमध्ये वापरले जाणार आहेत.
ब्रिटिश उच्चायुक्तांच्या प्रवक्त्यानुसार, या करारामुळे यूकेच्या क्लीन एनर्जी उद्योगाला भारतातील बाजारात प्रवेश मिळेल. तसेच, भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर चर्चा अपेक्षित आहे.
या ऐतिहासिक दौऱ्याबाबत बोलताना, ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी म्हटले की, “भारतासोबतचा व्यापार करार ब्रिटनसाठी ऐतिहासिक व टर्निंग पॉईंट ठरणार आहे. यामुळे हजारो रोजगार निर्माण होतील, नव्या व्यवसाय संधी उपलब्ध होतील आणि देशभरात आर्थिक विकासाला गती मिळेल.”