“आदिवासी, गरीब आणि वंचितांसाठी लढणारे जमीनी नेते”
नवी दिल्ली – झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलाने आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक्स’वर शोक व्यक्त करत लिहिले, “श्री शिबू सोरेन हे एक जमीनी नेता होते, ज्यांनी जनतेप्रती अटूट समर्पणाच्या बळावर सार्वजनिक जीवनात आपली जागा निर्माण केली. ते विशेषतः आदिवासी समुदाय, गरीब आणि वंचित वर्गाला सशक्त करण्यासाठी अत्यंत उत्साही होते. त्यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि त्यांच्या सर्व चाहत्यांप्रती आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री श्री हेमंत सोरेन यांच्याशी बोलून शोक व्यक्त केला. ॐ शांती.”
शिबू सोरेन गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर किडनीशी संबंधित आजारासाठी उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी ८:५६ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर झारखंडभरात शोककळा पसरली असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
