एस. जयशंकर जातील युएनजीए महासभेला
नवी दिल्ली, 06 सप्टेंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (युएनजीए) बैठकीत भाग घेण्यासाठी अमेरिकेला जाणार नाहीत. त्यांच्या जागी विदेश मंत्री एस. जयशंकर या बैठकीत सहभागी होतील. युएनजीएचे 80 वे सत्र 9 सप्टेंबरपासून सुरू होईल, ज्यामध्ये 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान उच्चस्तरीय बैठकींचा समावेश असेल. ही माहिती सुधारित यादीतून समोर आली आहे.
सुरुवातीचे भाषण ब्राझील देईल आणि त्यानंतर अमेरिकेचे प्रतिनिधी महासभेला संबोधित करतील. या दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 23 सप्टेंबरला युएनजीएमध्ये भाषण देणार आहेत. दुसरीकडे, विदेश मंत्री एस. जयशंकर 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करणार आहेत.
यापूर्वी, जुलै महिन्यात युएनजीएच्या वक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचे देखील नाव होते. पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबरला युएनजीएत भाषण देणार होते. परंतु, आता नवीन यादीमध्ये पंतप्रधान मोदींच्या ऐवजी विदेश मंत्री एस. जयशंकर यांचं नाव आहे, जे 27 सप्टेंबरला महासभेला भाषण देणार आहेत. मात्र, ही अंतिम यादी नसून यात अजूनही बदल होऊ शकतात.
