नवी दिल्ली, 6 सप्टेंबर – टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. त्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्याविषयीच्या संबंधांवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भारतावर अतिरिक्त शुल्क लागू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासोबतच्या आपल्या संबंधांबद्दल सार्वजनिकपणे पहिल्यांदाच व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या भावना आणि भारत-अमेरिका संबंधांबद्दलच्या सकारात्मक भूमिकेचे मनापासून कौतुक केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात एक अत्यंत सकारात्मक आणि दूरगामी, सर्वसमावेशक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांची घेतलेली सकारात्मक नोंद याचा मी मनापासून आदर करतो आणि त्यांच्या भावनांना आत्मियतापूर्ण प्रतिसाद देतो, असेही म्हटले आहे.