भारताच्या सेमीकंडक्टर युगाची सुरुवात
मुंबई, २ सप्टेंबर. देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात एक ऐतिहासिक क्षण घडला. भारतात तयार झालेली पहिली सेमीकंडक्टर चिप ‘विक्रम’ 32-बिट प्रोसेसर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून देण्यात आली. दिल्लीमध्ये ‘सेमिकॉन इंडिया 2025’ या महत्त्वपूर्ण परिषदेत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही चिप पंतप्रधानांच्या हस्ते सुपूर्द केली.
यावेळी बोलताना रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री वैष्णव यांनी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे भारत सेमीकंडक्टर क्षेत्रात जगातील उदयोन्मुख केंद्र बनत असल्याचे सांगितले. “काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’मुळे आज जग भारताकडे विश्वासाने पाहत आहे. केवळ साडेतीन वर्षांच्या कालावधीत देशाने स्वतःची पहिली स्वदेशी चिप तयार केली आणि ती पंतप्रधानांना भेट दिली ही अभिमानाची बाब आहे. आज पाच सेमीकंडक्टर युनिट्सचे काम देशात वेगाने सुरू असून जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत स्थिरता आणि विकासाचे प्रतीक ठरत आहे,” असे ते म्हणाले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सेमीकंडक्टर लॅबमध्ये विकसित करण्यात आलेला ‘विक्रम’ हा 32-बिट प्रोसेसर भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर आहे. प्रक्षेपण यानांसारख्या अत्यंत कठीण परिस्थितीतही तो योग्यरित्या कार्यरत राहू शकतो. त्यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये आणि संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील उपकरणांमध्ये या चिपचा वापर होण्याची मोठी शक्यता आहे.
सेमीकंडक्टर तंत्रज्ञान हे आधुनिक जगाचे केंद्रबिंदू मानले जाते. आरोग्यसेवा, वाहतूक, दळणवळण, संरक्षण, ऊर्जा आणि अंतराळ या सर्व क्षेत्रांसाठी सेमीकंडक्टर अनिवार्य झाले आहेत. डिजिटलीकरण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स युगात देशाची आर्थिक सुरक्षा आणि धोरणात्मक स्वातंत्र्य मजबूत करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’मुळे भारताने अल्पावधीतच या क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. सरकारने या क्षेत्राला चालना देण्यासाठी तब्बल 76 हजार कोटी रुपयांची प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना जाहीर केली होती. त्यापैकी सुमारे 65 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रकल्पांना आधीच मंजूर झाली आहे.
डिझाइन, पॅकेजिंग आणि उत्पादन या तिन्ही टप्प्यांवर भारत वेगाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (डीएलआई) योजनेअंतर्गत 23 चिप डिझाइन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. स्टार्टअप्स आणि नवसंशोधकांना प्रोत्साहन मिळाल्याने ‘वर्वसेमी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स’सारख्या कंपन्या संरक्षण, हवाई क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहने आणि ऊर्जा प्रणालीसाठी प्रगत चिप्स तयार करत आहेत. जून 2023 मध्ये गुजरातमधील साणंद येथे पहिल्या सेमीकंडक्टर युनिटला परवानगी मिळाली होती. सध्या गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यांमध्ये 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे दहा प्रकल्प मंजूर झाले आहेत.
ही प्रगती भारताला केवळ सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाचा ग्राहक म्हणून न पाहता, जगातील एक महत्त्वाचा निर्माता बनवण्याच्या दिशेने वाटचाल दर्शवते. ‘विक्रम’ 32-बिट प्रोसेसर ही त्या प्रवासातील पहिली ऐतिहासिक पायरी मानली जात आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे पाऊल भविष्यात तंत्रज्ञानाच्या जागतिक नकाशावर भारताचे स्थान अधिक बळकट करेल, यात शंका नाही.
