दिसपूर, 14 सप्टेंबर। “मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो,” असे विधान करत पंतप्रधान मोदींनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी दरांगमध्ये आयोजित जनसभेत ते बोलत होते.
आसामच्या दरांगमध्ये आयोजित जनसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर मी प्रथमच आसाममध्ये आलो आहे. आई कामाख्येच्या आशीर्वादामुळे ऑपरेशन सिंदूरला प्रचंड यश मिळाले. मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो. पण जेव्हा कोणाच्या आईचा, देशाच्या गौरवाचा अपमान होतो, तेव्हा ते मी सहन करू शकत नाही.”
पंतप्रधानांनी भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसवर हल्ला चढवत म्हणाले, “तुम्हीच मला सांगा की, भूपेनदांना भारतरत्न देण्याचा माझा निर्णय बरोबर होता की नाही? आणि काँग्रेसने त्यांचा केलेला अपमान बरोबर होता की चूक?”
पंतप्रधानांनी आरोप केला की काँग्रेसने मतबॅंकेच्या राजकारणासाठी योजनाबद्ध रीतीने घुसखोरी घडवून आणली. त्यांनी सांगितले की, असममधील हेमंता बिस्वा सरमा सरकारने लाखो एकर जमीन घुसखोरांपासून मुक्त केली आहे.
जनसभेत पंतप्रधानांनी लोकांना स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. आसामच्या विकासावर भाष्य करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज भारत हा जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश आहे आणि आसाम हा भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. आज असम 13% विकास दरासह उल्लेखनीय प्रगती करत आहे.”
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी आसाममध्ये 18,530 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.