पुणे, 9 सप्टेंबर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) साडेएकोणीस हेक्टर जमिनीच्या परताव्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचे वाटप ९० शेतकऱ्यांना होणार आहे. १९७२ ते १९८३ या काळात विविध विकासकामांसाठी शेतकऱ्यांकडून ही जमीन संपादित करण्यात आली होती. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेले शेतकरी आणि त्यांच्या वारसांना यामुळे दिलासा मिळणार आहे.‘पीएमआरडीए’ने जमीन परताव्याबाबत यापूर्वी आवाहन करून संबंधित शेतकऱ्यांना हरकती किंवा सूचना कळविण्याची संधी दिली होती.
यासाठी नोटीसही पाठविण्यात आल्या होत्या. मात्र काही शेतकऱ्यांनी अजूनही ‘पीएमआरडीए’शी संपर्क केलेला नाही.त्यामुळे अशा प्रकरणांची नोंद वेगळी ठेवून पुढील कार्यवाही करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची यादी पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने संबंधित गावांमध्ये पात्र शेतकऱ्यांची नावे तहसील व तलाठी कार्यालयांमध्ये प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे संबंधितांनी प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधून आपले हक्क सिद्ध करावेत, असे आवाहन केले आहे.