अमरावती, 6 सप्टेंबर।
पोस्को गुन्हयातील प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. गाडगेनगरचे ठाणेदार अतुल वर यांच्या नेतृत्वात पोलीसांनी सदर कार्यवाही केली आहे.
पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे ४ तारखेला अल्पवयीन पिडीतेच्या आईच्या तक्रारी वरुन आरोपी नामे अजय राजकुमार गवई (४० वर्ष रा. वडाळी, प्रबुध्दनगर, अमरावती) याचे विरुध्द अपराध कलम ७५ भारतीय न्याय संहिता सहकलम ८/१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी ही ४ तारखेला दुपारी दीड वाजता त्यांचे अल्पवयीन मुलीसह अमरावती शहरातील बियाणी चौक येथे असलेल्या हॉटेल ओमीका येथे टिचर डे निमीत्त असलेल्या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी फिर्यादी जेवण करीत असतांना त्यांची अल्पवयीन मुलगी ही हॅण्डवॉश करणे करीता वॉशरुम मध्ये गेली होती. यावेळी हॉटेलमधील एका व्यक्तीने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलीला बँडटच केले होते.
मुलीनी ही बाब आईला सांगितली. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे सोबत असलेल्या लोकांनी हॉटेल मधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहीले असता सदरचा व्यक्ती हा हॉटेलमधील स्विपर अजय राजकुमार गवई हा असल्याचे खात्री झाली. यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे येऊन फिर्यादी दिल्याने आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त परीमंडळ १, सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे, गाडगेनगरचे ठाणेदार अतुल वर, पोलीस निरीक्षक विजया पंधरे, समाधान वाठोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीमती आरती गवई यांनी गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोउपनि श्रीमती सुषमा आठवले यांनी गुन्ह्याचा तपास पोउपनि श्रीमती सोनाली सोनवणे, अंमलदार अमर तायडे, पोलीस स्टेशन गाडगेनगर यांचे सहकार्याने करण्यात आला. आरोपीस तात्काळ अटक करुन गुन्ह्याचा तपास २४ तासात पूर्ण करुन यातील आरोपीविरुध्द मा. विशेष सत्र न्यायालय अमरावती येथे दोषारोपपत्र पाठवण्यात आले.