सोलापूर, 30 जून (हिं.स.) प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला आता ७३ दिवस झाले आहेत. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांना जामीन मिळाला. युक्तिवादावेळी मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी डॉक्टरांच्या मोबाईलच्या ‘सीडीआर’चा मुद्दा उचलला होता. त्यानुसार पोलिसांनी तो ‘सीडीआर’ न्यायालयात सादर केले आहे.
डॉ. वळसंगकरांनी २०२२ ते २०२४ या काळात स्वत:च्या रुग्णालयाचा कारभार सोडला आणि डिसेंबर २०२४ पासून पुन्हा रुग्णालयाचा कारभार स्वत:कडे घेतला आणि ओपीडी पाहू लागले. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका असिस्टंटने ‘१५ एप्रिल २०२५ पासून डॉक्टरांनी नियमित ओपीडी सुरू केली. त्याबद्दल डॉक्टरांनी मला कॉल करून सांगितले. त्यांनतर मी नियमित रुग्णालयात येऊ लागले.
१८ एप्रिलला डॉक्टर ओपीडीत आले, त्यावेळी टेन्शनमध्ये दिसले. त्यावेळी त्यांनी मनीषाने आत्महत्येची धमकी दिल्याने टेन्शनमध्ये असून काय करावे ? मला सुचत नसल्याचे सांगितले. तेव्हा तुम्ही शांत रहा, आपण काहीतरी मार्ग काढू, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर ते दुपारी १२ वाजता घरी गेले. त्या दिवशी मी घरी असताना रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास डॉक्टरांना ओपीडीसंदर्भात फोन लावला. त्यावेळी ते अतिशय तणावात वाटले, मनीषामुळे मी खूप दु:खी आहे, मी आतापर्यंत कमावलेली इज्जत धुळीला मिळवेल म्हणून तिने धमकी दिली आहे, असे म्हणून त्यांनी कॉल कट केला. काहीवेळाने डॉक्टरांनी पुन्हा कॉल केला. त्यावेळी त्यांना काय झाले विचारल्यावर मी जास्त बोलू शकत नाही म्हणून त्यांनी फोन कट केला.