सोलापूर, 9 मे (हिं.स.)।
जुन्या वादातून एकाचा पिस्तुलाच्या साह्याने खून करण्यासाठी आलेल्या दोघा अल्पवयीन संशयित आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे एकाचा जीव वाचला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोन संशयित आरोपींसह दोन अल्पवयीन संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या जुना सांगोला रोड परिसरात करण्यात आली.
जुन्या वादातून एकाचा खून करण्यासाठी तीन जण मोटारसायकलवरून येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तत्काळ जुना कासेगाव रोड व न्यायालय परिसरात शोधमोहीम सुरू केली.