मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्याकडील सर्व खात्याचे कामकाज मात्र काढून घेण्याचा निर्णय घेतला असून आता मलिक हे बिनखात्याचे मंत्री असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काल गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आलाय. नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झालेत.
राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्यणानुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजेश टोपे यांच्याकडे नवाब मलिक यांच्याकडे असणारं दुसरं खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असणारा राजेश टोपे आता कौशल्य विकास आणि रोजगार या विभागाचा कार्यभारही पाहतील.
दोन विभागांबरोबरच नवाब मलिक यांच्याकडे असणारी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर परभणीचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. Nawab Malik now Minister of Accounts; Who holds the post of Guardian Minister of Parbhani and Godinya?
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल सांगताना नवाब मलिक यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. “नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचं आम्ही ठरवलं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.
मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद नवाब मलिकांकडे आहे आणि लवकरच मुंबई महापालिका निवडणुक आहे, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. नवाब मलिक उपलब्ध नसल्याने पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासमवेत करतील.”
● नवाब मलिकांचे दोन्ही पालकमंत्री पद कोणाकडे ?
नवाब मलिकांकडे दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. तिथे आता परभणीत धनंजय मुंडे हे पालकमंत्री असतील आणि गोंदियात प्राजक्त तनपुरे हे पालकमंत्री असतील, हा निर्णय आम्ही घेतला आहे. मी मुख्यमंत्र्यांनी मी पत्र पाठवून आमच्या पक्षाकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना कळवला आहे, मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील. नवाब मलिकांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या विभागाचं काम पूर्णपणे ठप्प झालं आहे. यामुळेच ही जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांना देण्याची आवश्यकता असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलं.
● ….पण मंत्रीपदावर कायम राहतील – जयंत पाटील
नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलेलं आहे. अनिल देशमुखांनी अटक झाल्यावर स्वत:हून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची जी अटक झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे, अशी आमची धारणा आहे. त्या पद्धतीने न्यायालयात लढाई सुरू आहे. तोपर्यंत त्याच्या विभागाचा भार हा दुसऱ्यांना सोपवला जात आहे, नवाब मलिक हे मंत्रिपदावर कायम राहतील,” असं जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितलं.