सोलापूर, 12 मे (हिं.स.)।
अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन, शहीदांना श्रद्धांजली, काँग्रेस देशासोबत आणि सैन्यदलासोबत आहे. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा परिसरात जय हिंद यात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार शिंदे बोलत होत्या.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन देशभक्तीच्या गीतांसोबत, भारतीय सेना झिंदाबाद, वीर जवान संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, वंदे मातरम्, आवाज दो हम एक है, पाकिस्तान मुर्दाबाद, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे हैं, भारत माता की जय, जिसने आतंक फैलाया उसको सेना ने सबक सिखाया, हर हमले को किया नाकाम भारत की सेना को सलाम आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.