पुणे, 11 जून (हिं.स.)
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा व संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू व श्रीक्षेत्र आळंदीतून पंढरीकडे मार्गस्थ होण्यास अवघे १०-११ दिवस उरले असताना, पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची व विविध दिंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पायी वाटचालीत वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठीचे तंबू खरेदी व दुरुस्ती पूर्ण झाली आहे. भजनासाठी आवश्यक असणाऱ्या पखवाजांसह इतर भजन साहित्य दुरुस्ती, खरेदी व इतर कामांची लगबग दिसून येत आहे.दिंड्यांच्या तयारीबाबत मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळा संस्था दिंडी क्र.३३ चे सचिव हभप सुदाम भेगडे, पवन मावळ दिंडीचे सचिव हभप उत्तम बोडके, श्रीक्षेत्र घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हभप मुकुंद महाराज राऊत, वैकुंठवासी हभप महादेवबुवा काळोखे मुकादम प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हभप संतोष महाराज काळोखे, श्रीनाथसाहेब प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हभप माऊली नाणेकर आदी पदाधिकाऱ्यांनी पायी वारी नियोजनाबाबत माहिती दिली.
आषाढी पायी वारीसाठी दिंड्याकडे असणारे सर्व पखवाज दुरुस्तीसह शाई भरणे, ओढ काढणे, पान बदलणे आदी कामे आळंदी व देहूतील संबंधित निष्णात कारागिरांकडून केली असून, गरजेनुसार भजन साहित्याची नव्याने खरेदी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. टाळ, वीणा आदी भजन साहित्य दुरुस्त केले आहे. वाटचालीत न मिळणारे काही साहित्य, तसेच किराणा खरेदी आदी कामे सुरू झाली आहेत.