नवी दिल्ली, 13 जुलै (हिं.स.) :
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी रविवारी माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील विशेष सरकारी
वकील उज्ज्वल निकम, केरळ भाजप नेते सी. सदानंदन मास्टर आणि
इतिहासकार मीनाक्षी जैन यांचे राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल कौतुक केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर या
चौघांचे योगदान अतुलनीय आहे आणि त्यांची तज्ज्ञता संसदेच्या कामकाजाला समृद्ध
करेल.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्व नामांकित सदस्यांचे अभिनंदन करत त्यांना
शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी उज्ज्वल निकम यांचे कौतुक केले आणि म्हटले की, कायदा आणि संविधान क्षेत्रातील त्यांचे
समर्पण अनुकरणीय आहे. त्यांनी लिहिले की, “ते केवळ एक यशस्वी वकील राहिले नाहीत, तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय
देण्याच्या प्रक्रियेतही त्यांनी आघाडीची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संपूर्ण
कायदेशीर कारकिर्दीत त्यांनी नेहमीच संवैधानिक मूल्ये मजबूत करण्यासाठी आणि
सामान्य नागरिकांना सन्मानाने न्याय देण्यासाठी काम केले आहे. राष्ट्रपतींनी
त्यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे ही खूप आनंदाची बाब आहे. त्यांच्या संसदीय
कार्यकाळासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.”
त्याचप्रमाणे, पंतप्रधान मोदींनी हर्षवर्धन श्रृंगला
यांच्या भारताच्या परराष्ट्र धोरणातील महत्त्वाच्या योगदानाचा उल्लेख केला.
त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “हर्षवर्धन श्रृंगला यांनी राजनयिक, बौद्धिक आणि धोरणात्मक विचारवंत म्हणून
उत्तम काम केले आहे. त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला बळकटी देण्यात
महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासोबतच, त्यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षपदातही विशेष
योगदान दिले आहे. राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेत नामांकित केले याचा मला आनंद
आहे. त्यांचा अनोखा दृष्टिकोन संसदेच्या कामकाजाला निश्चितच समृद्ध करेल.”
मीनाक्षी
जैन यांचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “त्यांनी एक विद्वान, संशोधक आणि इतिहासकार म्हणून आपला ठसा
उमटवला आहे. शिक्षण, साहित्य, इतिहास आणि राजकीय शास्त्र या क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे
शैक्षणिक चर्चा लक्षणीयरीत्या समृद्ध झाली आहे. त्यांच्या संसदीय कार्यकाळासाठी
शुभेच्छा.”
पंतप्रधानांनी
सी. सदानंदन मास्टर यांना अन्यायासमोर न झुकण्याच्या भावनेचे प्रतीक म्हणून वर्णन
केले. ते म्हणाले, “हिंसाचार आणि भीतीचे वातावरण देखील राष्ट्र उभारणीच्या त्यांच्या संकल्पाला
डळमळीत करू शकले नाही. शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे प्रयत्न
कौतुकास्पद आहेत. तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांची वचनबद्धता उल्लेखनीय आहे.
राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामांकन केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि
त्यांच्या संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा.”
केंद्रीय
गृह मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रपती मुर्मू यांनी संविधानाच्या कलम ८० (१)
(अ) च्या कलम (३) द्वारे त्यांना दिलेल्या अधिकारांनुसार राज्यसभेसाठी चार जणांची
नावे नामांकित केली आहेत. यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि
शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्टर, भारताचे
माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ
मीनाक्षी जैन यांची नावे समाविष्ट आहेत. पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्तीमुळे
रिक्त असलेल्या जागा लक्षात घेता हे नामांकन करण्यात आले आहे.
