आमदार फुकेंच्या कुटुंबातील वाद आले चव्हाट्यावर
मुंबई, 07 जुलै (हिं.स.) : भाजप आमदार परिणय फुके यांच्याविरोधात त्यांच्या लहान भावाच्या पत्नी प्रिया फुके आक्रमक झाल्या आहेत. प्रिया यांनी आज, सोमवारी मुंबईच्या विधानभवनाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यासंदर्भातील माहितीनुसार आ. परिणय फुके यांचे धाकटे बंधू संकेत फुके यांचे 2022 मध्ये किडनीच्या आजाराने निधन झाले. त्यानंतर फुके कुटुंबात वाद उफाळून आले. संकेतच्या मृत्यूनंतर फुके कुटुंबियांनी घराबाहेर हाकलल्याचा आरोप प्रिया यांनी केला. तर प्रिया स्वतःहून घर सोडून गेल्या असून नातवंडांना भेटू देत नसल्याचा फुके कुटुंबियांचा दावा आहे. फुके कुटुंबातील या भांडणात उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी उडी घेतली. त्यांनी 28 मे 2025 रोजी प्रिया यांच्यासह नागपुरत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. त्यानंतर प्रिया फुकेंनी आपल्या मुलांसह मुंबई गाठत विधानभवनाबाहेर निद्शने केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या प्रिया फुकेंना पोलिसांनी ताब्यात घेतले.
