पुणे, 27 मे : पुणे महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामात मोठा घोटाळा समोर आला आहे. शहरातील बिबवेवाडी आणि सरकारनगर परिसरात पोकलेन मशीनने काढलेला गाळ पुन्हा नाल्यात टाकण्यात येत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, महापालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बिबवेवाडी आणि सरकारनगरमधील प्रकार व्हायरल
बिबवेवाडी येथील व्हिडिओमध्ये एक पिवळ्या रंगाची पोकलेन मशीन नाल्यातील गाळ उकरताना दिसते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गाळ उचलल्यानंतर तो पुन्हा नाल्यातच सोडण्यात येत आहे. सरकारनगर येथील फुलपाखरू उद्यानाजवळदेखील केसरी रंगाच्या पोकलेनने याचप्रकारे गाळ टाकताना दुसरा व्हिडिओ समोर आला आहे.
नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया: नालेसफाई की केवळ दिखावा?
हे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून, “नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जात आहे का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्रशासनाची ढिसाळ कार्यपद्धती आणि पैसे वाया घालवणाऱ्या योजनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. परंतु या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांना महापालिकेच्या पारदर्शकतेवर आणि कामाच्या दर्जावर संशय वाटू लागला आहे. शहरात दरवर्षी पावसात नाले तुंबणे, रस्त्यांवर पाणी साचणे यासारख्या समस्या वाढत असताना, अशा अप्रामाणिक कामांमुळे परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे.