पुणे, 13 सप्टेंबर। चाकण येथे सध्या नगर परिषद, पीएमआरडीए, एनएचएआय यांच्या वतीने अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही कारवाई करण्यात येत आहे. परंतु ही अतिक्रमणे काढल्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी पुन्हा अतिक्रमणे केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी सांगितले.
चाकण (ता. खेड) येथील वाहतूक कोंडीत सुधारणा होण्यासाठी पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-शिक्रापूर, चाकण-तळेगाव मार्गावर अतिक्रमण कारवाई सध्या सुरू आहे. या मार्गांची शासकीय जी मोजमापे आहे त्यानुसार अतिक्रमण कारवाई सुरू आहे. अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर रस्ते काही ठिकाणी मोकळे झाले तर काही ठिकाणी अजूनही मोकळे झालेले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न काही सुटत नाही हे विदारक चित्र आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमण ही काढण्याची गरज आहे.