पुणे : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांनी तक्रारींचा पाढा वाचला. दरम्यान केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशात सर्वात जास्त रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग पुण्यात आहे, ही चिंतेची बाब आहे.
‘प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना पुण्यात बेडच मिळत नाही. यंत्रणेवर कोणाचंही नियंत्रण नाही. अधिकारी नेमकं काय करतात? कोणालाच कळत नाही’, अशा तक्रारी आमदार आणि खासदारांनी प्रकाश जावडेकर आणि शरद पवार यांच्याकडे केल्या.
या बैठकीनंतर पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि शरद पवारांनी बैठक घेतली याचा अर्थ आम्ही अपयशी ठरलो, असा होत नाही. कारण ते पुण्याचेच नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आढावा बैठक घेतली. दोघांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत. त्या सूचना आम्ही अंमलात आणू, पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये काही त्रूटी आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्याबाबतीत जे घडलं ते चुकीचं घडलं’, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘पुण्याच्या सद्यस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठकी पार पडल्या. जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये सुविधांची कमतरता आहे. हा मुद्दा मांडला. यात खोटं बोलणाऱ्यावर कारवाई करा. कारण सध्या 330 बेडंस उपलब्ध असल्याचं आधी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे म्हणाले होते. पण नंतर त्यांनी असं बोललोच नाही, असं स्पष्टीकरण दिलं’, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
‘जम्बो हॉस्पिटलमध्ये असुविधा आहेत. हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई करा, ही मागणी केली. क्रिटिकल रुग्णांचा विचार झाला पाहिजे. सरकारी आरटीपीसीआर टेस्टिंग कमी होत आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार. कोरोना हाताबाहेर गेलेला नाही. मात्र, सध्या सुविधा देणं महत्त्वाचं आहे’, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
* शरद पवारांनी केल्या सूचना
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन खासदार शरद पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृती भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, अशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.
खासदार शरद पवार म्हणाले, मॉल, बसस्थानक, रेल्वे स्थानक, मोठी दुकाने याठिकाण च्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी बंधनकारक करावी. बांधून तयार असणाऱ्या इमारतींचा उपयोग कोविड उपचार केंद्रासाठी करता येऊ शकेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.