पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या मंचर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चावडी चौकात रस्त्याचे काम सुरू असताना येथील दर्ग्याचा एक भाग कोसळला. त्यानंतर कोसळलेल्या भागाखाली भुयारासारखी रचना दिसून आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून हिंदू संघटनांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुस्लीम समुदायातील लोकही जमले.
दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही समुदायांची समजूत घालत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या भुयाराची पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करत आहेत.
भुयारासारखी रचना आढळल्यानंतर या ठिकाणी शुक्रवारी जेसीबी लावून खोदकामही करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिसरात फौजफाटा वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंदू संघटनांनी याठिकाणी प्राचीन रचना असण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मुस्लीम समुदायाने हा दर्गा शेकडो वर्षापूर्वींचा असल्याचा दावा केला आहे.