पुणे, 20 जून (हिं.स.)।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या ‘क्यूएस रॅंकिंग’मध्ये ५६६ व्या स्थानावर मजल मारली आहे. तर, भारतातील शिक्षण संस्था आणि विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठ १४ व्या क्रमांकावर आहे. तर, देशातील सार्वजनिक विद्यापीठांच्या क्रमावारीत विद्यापीठ दुसऱ्या स्थानावर आहे.
‘क्युएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी’ हे उच्च शिक्षणातील जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचे रॅंकिंग मानले जाते. यावर्षी जागतिक क्युएस मानांकन २०२६ क्रमवारीत १०६ देशांतील आठ हजार ४६७ शैक्षणिक संस्थांची तपासणी करण्यात आली. यात दीड हजारांहून अधिक संस्थांना अंतिम क्रमवारीत स्थान मिळाले. देशातील केवळ ५४ विद्यापीठे या यादीत समाविष्ट आहेत. सातत्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी, नविन्यपूर्णतेतील सर्वोच्चता, सामान्य माणसाच्या जीवनाच्या उपयोगात येण्याची क्षमता असलेले संशोधन, लोकमानसातील प्रतिमा, अध्यापन-अध्ययनातील प्रयोगशीलता, बहुस्तरीय उद्योगक्षेत्राशी सामंजस्य आणि सहयोग यांच्या जोरावर आणि सर्व अधिकार मंडळे, संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था या आधारावर विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत आपले वर्चस्व ठेवले आहे.