मुंबई, १३ जून (हिं.स.) : विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि भयमुक्त शिक्षण देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) लागू केलेल्या रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्याबद्दल देशातील ८९ शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये आयआयटी मुंबई, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि पुण्यातील स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ यांचा देखील समावेश आहे.
यूजीसीने २००९ साली रॅगिंगविरोधी नियमावली लागू केली असून ती सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांवर बंधनकारक आहे. मात्र, काही नामांकित संस्थांनी देखील या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे यूजीसीच्या अँटी-रॅगिंग मॉनिटरिंग एजन्सी, हेल्पलाईन कॉल्स व पाठपुरावा यामध्ये आढळून आले आहे.
नियमांचे अंमलबजावणीत झालेल्या हलगर्जीपणाची दखल घेत यूजीसीने संबंधित संस्थांकडून येत्या ३० दिवसांत रॅगिंगविरोधी उपाययोजना व विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या प्रतिज्ञापत्रांचा विस्तृत अहवाल मागवला आहे. दिलेल्या मुदतीत समाधानकारक माहिती न दिल्यास आर्थिक सहाय्य, संशोधन प्रकल्प निधी, मान्यता अथवा संलग्नता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही यूजीसीने दिला आहे.
शिक्षण संस्थांमध्ये रॅगिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी यूजीसी सातत्याने उपाययोजना राबवत आहे. मात्र, अजूनही काही संस्थांमध्ये रॅगिंगच्या घटना घडत असल्याचे यूजीसीच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.