नवी दिल्ली, 18 सप्टेंबर – मतचोरीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर आता निवडणूक आयोगाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. यात राहुल गांधींनी केलेले आरोप हे चुकीचे आणि निराधार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. कोणतीही सामान्य व्यक्ती ऑनलाइन पद्धतीनं नाव हटवू शकत नाही. नाव हटवण्यापूर्वी संबंधित आयोगाकडून मतदाराला म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते.
निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. याबाबत कॉंग्रेसच्या पेजवरुन करण्यात आलेल्या लाईव्हचा फोटो शेअर करत अयोग्याचा (Incorrect) शिक्का निवडणूक आयोगाने लावला आहे. त्याचबरोबर हे सर्व आरोप बिनवुडाचे असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. आयोगाने त्यांच्या एक्स या सोशल मीडिया पोस्टमध्ये खासदार राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
पुढे निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपावर फॅक्टचेक करत उत्तर दिले. निवडणूक आयोगाने सांगितले की, खासदार राहुल गांधी यांनी गैरसमज केल्याप्रमाणे, कोणत्याही नागरिकाकडून ऑनलाइन कोणतेही मत हटवता येत नाही. २०२३ मध्ये, अलांड विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच एफआयआर दाखल केला. नोंदीनुसार, अलांड विधानसभा मतदारसंघ २०१८ मध्ये सुभद गुट्टेदार (भाजप) आणि बी.आर. पाटील (काँग्रेस) यांनी जिंकला होता, अशा शब्दांत निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील राजुरी मतदारसंघाचेही उदाहरण दिले. निवडणूक आयोगाने मतचोरांना आणि लोकशाही संपवणाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवरील आरोप निराधार आणि अयोग्य आहेत, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.