मुंबई, 21 एप्रिल (हिं.स.) – राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची, भारतीय लोकशाहीची आणि भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली. सातत्याने ते अशा प्रकारची बदनामी करत असून हे अतिशय निंदनीय कृत्य आहे. वारंवार निवडणूकांमध्ये पराभव झाल्याने त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसत आहे. परंतू, ते विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे विदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करत असतील, तर ते नेमका कोणाचा अजेंडा चालवतात असा संशय निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, राहुल गांधींनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात फिरुन भारताची बदनामी करून त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेत विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मते वाढतील. परंतू, ते करण्याऐवजी भारताला बदनाम करण्याचे काम ते करतात. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली या सगळ्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. आता मतदान प्रक्रिया आणि मतदार यादीवर ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. हा अतिशय बाळबोध प्रकार असून राहुल गांधींनी भारताची बदनामी करणे बंद करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रात हरले, हरियाणात हरले, दिल्लीत हरले. त्यांनी भारताची बदनामी करणं बंद करावं’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही राहुल गांधींच्या विधानावर निशाणा साधला. ते म्हणाले, भारतीय मतदारांचा विश्वास जिंकू न शकलेले लोकशाहीविरोधी, भारतविरोधी राहुल गांधी यांनी परदेशातील भारतीय लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. राहुल नेहमीच परदेशात भारताची बदनामी का करतात? ‘जॉर्ज सोरोसचा एजंट, भारतीय राज्याशी लढत आहे, राहुल गांधी आज तेच करू इच्छितात!