अमरावती, 24 मे (हिं.स.)
पथकासह गस्तीवर असलेले फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातील डीबीस्कॉडचे प्रमुख पीएसआय राहुल महाजन यांनी एका कुख्यात गांजा तस्कराच्या घरी छापा मारला. पोलिसांना तस्कराच्या घरातून २५ हजार रूपये किमतीचा ६९० किलोग्रॅम गांजा मिळाला. परंतु, घरझडतीमध्ये पोलिसांचा तलवारीसह ५ प्रकारचे चायना चाकू मिळाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी एका तस्करास अटक केली. परंतु, तस्कराचासाथीदार फरार होण्यात यशस्वी झाला.
शेख वसीम उर्फ गुल्लु शेख हसन (१९) रा. व्यंकय्यापुरा, धर्माळे यांच्या घरी भाड्याने असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर फरार आरोपीचे नाव मुन्ना सरकार उर्फ मुन्नाकॅन्सर उर्फ शेख अन्वर उर्फ शेख मुनीर उर्फ जीभकापलेला (६०) रा. गुलिस्ता नगर असे फरार आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, व्यंकय्यापुरा येथील धर्माळेच्या घरी भाड्याने राहणारा कुख्यात आरोपी शेख वसीम व मुन्ना कॅन्सर हे दोघे घरातून लोकांना गांजाची छुप्या पध्दतीने विक्री करित असल्याची गोपनीय माहिती फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातील डीबीस्कॉडचे प्रमुख पीएसआय राहुल महाजन यांना मिळाली. त्यानुसार पीएसआय राहुल महाजन यांनी पथकासह रात्री ११ वाजताच्या सुमारास शेख वसीम उर्फ गुल्लूच्या घरावर छापा मारला. अशातच पोलिसांना दुरूनच पाहुन मुन्ना सरकार उर्फ मुन्ना कॅन्सर पळून गेला.
पोलिसांनी शेख वसीमला पकडून त्याची घर झडती घेतली असता पोलिसांना २५ हजार रूपये किमतीचा ६९० किलोग्रॅम ओला गांजा मिळून आला. परंतु, पोलिसांना घरझडतीमध्ये शेख वसीमच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त मिळाला. शेख वसीमच्या घरात १ स्टीलची धारधार तलवार, दोन चायना चाकू, दोनचायना शिकारी चाकू व एक चायनाचा फोल्ड होणारा चाकू असा २० हजार ७५० रूपयांचा शस्त्रसाठा मिळाला.
त्यानुसार पोलिसांनी शेख वसीमच्या ताब्यातून गांजा व शस्त्रसाठा असा एकूण ४५ हजार ७५० रूपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत पोलिसांनी शेख वसीम विरोधात फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्ट व एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले असून पोलिस फरार आरोपी मुन्ना सरकार उर्फ मुन्ना कॅन्सरचा कसून शोध घेत आहेत.