अलिबाग, 11 ऑगस्ट – विविध स्थानिक प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेना (उबाठा गट) तर्फे सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान पोलिसांचे बॅरिकेड तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. जवळपास दीड तास पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी केले.
या मोर्चात जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, प्रसाद भोईर, दिपश्री पोटफोडे, शिल्पा घरत, दर्शना जवके, शिरीष घरत, नंदकुमार शिर्के, सतीश पाटील, प्रशांत मिसाळ, अविनाश म्हात्रे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चाच्या मार्गावर खड्डे आणि चिखल साचल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते. सरकारविरोधी घोषणाबाजीसह स्थानिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न होताच वातावरण तणावपूर्ण झाले. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनात तातडीने समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
मुख्य मागण्यांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना डान्स बारमधील बेकायदेशीर कृत्यांमुळे मंत्रिमंडळातून काढणे, MIDC, MMRDA आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील मागील 16 वर्षांच्या अनियमिततेबाबत CAGमार्फत विशेष ऑडिट, नाशिक येथील ‘हनिन ट्रॅप’ प्रकरणाची सखोल चौकशी, ‘वोट चोरी’ प्रकरणातील आरोपींवर निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई, गृहनिर्माण मंत्री प्रा. संजय सरनाईक यांच्या ‘पीडीडी’ प्रकरणाची चौकशी आणि राज्यातील लाडक्या बहिणींना मंजूर अनुदानातील गैरव्यवहारातील अधिकाऱ्यांवर प्रथम गुन्हे दाखल करण्याची मागणी होती.