ठाणे, 25 एप्रिल (हिं.स.)। – रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याऐवजी कामात हलगर्जीपणा करत प्रवाशांच्या प्रवासात अडचणी निर्माण करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज चांगलेच फैलावर घेतले. अचानक ट्रेन रद्द करणे, नियमित धावणारी ट्रेन बंद करून वातानुकूलित रेल्वे सुरू करणे, अस्वच्छ स्वच्छतागृहे -विश्रामगृहे तसेच खासदारांना विश्वाासत न घेता विकासकामे सुरु करणे यावरुन अधिकाऱ्यांची खासदार नरेश म्हस्के यांनी खरडपट्टी काढली. यापुढे मतदारसंघातील खासदारांना विकासकामांची माहिती देण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांना दिले.
पश्चिम रेल्वे अंतर्गत येणाऱ्या स्थानकांतील खासदारांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये खासदार नरेश म्हस्के, खासदार रविंद्र वायकर, खासदार वर्षा गायकवाड, खासदार अनिल देसाई, खासदार सौ. स्मिता वाघ, खासदार उमेशभाई पटेल, खासदार शोभा बच्छाव, रेल्वेचे जीएम अशोक कुमार मिश्रा, डीआरएम पंकज सिंग व रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या भाईंदर आणि मिरारोड या रेल्वे स्थानकांसंदर्भातील अडचणी खासदार नरेश म्हस्के यांनी मांडत विविध सूचना केल्या.
भाईंदर पश्चिमेतील उत्तरेकडील अॅक्सिलेटरचे काम पूर्ण झाले आहे, ज्याच्या उद्घाटनामुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. प्रवाशांची संख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता प्लॅटफॉर्म 3/4 वर अॅक्सिलेटरची स्थापना, प्लॅटफॉर्म 5 वर लिफ्ट आणि अॅक्सिलेटर बसवणे, प्लॅटफॉर्म 4 आणि 5 दरम्यान अतिरिक्त प्लॅटफॉर्म (4-लाइन बॉक्स) तयार करणे. भाईंदर पश्चिमेकडील गोराईपर्यंत दररोज सुमारे 7 लाख प्रवासी येतात. पूर्वेकडील कॉलेज आणि रामदेव पार्क पर्यंतचे प्रवासी देखील भाईंदर रेल्वे स्थानकाचा वापर करतात. प्रवाशांची ही मोठी संख्या पाहता, भाईंदर येथून अधिक लोकल गाड्या चालवणे आवश्यक आहे. भाईंदर हे एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे जिथे रोजगार आणि व्यवसायासाठी दररोज बाहेरील भागातून लाखो प्रवासी येतात. या वाढत्या प्रवाशांना सुरळीत वाहतूक प्रदान करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांचा विस्तार महत्त्वाची भूमिका बजावेल असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
बोरिवली ते डहाणू रोड पर्यंत तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भाईंदर पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी चिन्हांकित केलेली रेल्वे जमीन वर्षानुवर्षे एका बिल्डरशी करारबद्ध करण्यात आली आहे. यामुळे ती जमीन सध्या रेल्वेला परत करण्यात आलेली नाही. रेल्वे नियमांनुसार प्लॅटफॉर्मवर लिफ्ट आणि एक्सलेटर बसवण्यासाठी किमान 10 मीटर रुंदी आवश्यक आहे, तर सध्या त्या ठिकाणी 6 मीटर जागा उपलब्ध आहे. ज्यामुळे लिफ्ट आणि एक्सलेटर बसवणे कठीण होत आहे. या संदर्भात माझ्याकडे काही कागदपत्रे उपलब्ध आहेत. जी मी तुम्हाला सादर करू शकतो. शासनाने बिल्डरविरुद्ध तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. विकासकामात अडथळा येऊ नये म्हणून जमिनीशी संबंधित ही समस्या प्राधान्याने सोडवावी, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली.
मीरा रोड पश्चिम येथे एक नवीन प्लॅटफॉर्म बांधला जाणार आहे. या प्लॅटफॉर्मची रुंदी किमान 10 मीटर ठेवावी जेणेकरून भाईंदर स्थानकासारखी गर्दीची परिस्थिती टाळता येईल. भूखंडाच्या उपलब्धतेनुसार त्याचे योग्य नियोजन करावे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशनवर बांधलेला हॉल सध्या भिकाऱ्यांचा अड्डा बनला आहे. फेरीवाल्यांचाही प्रवाशांना त्रास होत आहे. या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
प्रवाशांची संख्या लक्षात घेता लांब रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून तिकीट खिडक्यांची संख्या पुरेशी वाढवावी. रेल्वेने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी साखळी पद्धतीने लोकल गाड्या चालवाव्यात. विरार ते वसई, बोरिवली, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल अशा ठिकाणी लोकल गाड्या धावतात. त्याचप्रमाणे वसई ते भाईंदर, मीरा रोड, अंधेरी अशा ठिकाणी लोकल गाड्या सुरू कराव्यात. यामुळे मीरा रोड आणि भाईंदरच्या प्रवाशांना मुंबईच्या विविध ठिकाणी जाणे सोयीस्कर असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
भाईंदर आणि मिरारोड स्टेशन वरील समस्यांचे निवेदन खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. यावेळी निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, मीरा भाईंदर विधानसभा प्रमुख विक्रम प्रतापसिंह उपस्थित होते.
—————