मुंबई, 2 जुलै (हिं.स.)। राज्यात मोसमी पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने
मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः २ आणि
३ जुलै या दोन दिवसांदरम्यान मुंबईमध्ये ९० ते १२० मिमी पावसाची नोंद होण्याची
शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण भारतातील कमी दाबाचा पट्टा सध्या मध्य भारताकडे सरकत
असून, यामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे. यासोबतच वाऱ्याचा वेगही
वाढण्याची शक्यता असून, समुद्रकिनारी तसेच उंच भागांमध्ये सतर्कतेचा
इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत उत्तर उपनगरांवर पावसाचा विशेष प्रभाव बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड या उत्तर उपनगरांत तुलनेने अधिक पाऊस
पडण्याची शक्यता आहे, तर दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी राहील. पालघर
जिल्हा आणि पश्चिम घाट परिसरातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात आजचा पावसाचा अंदाज (२ जुलै):
मुसळधार पाऊस: मुंबई, ठाणे, पालघर
अतिमुसळधार पाऊस: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा
वादळी वाऱ्यासह पाऊस: छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर
हलक्या सरी: पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव
जुलैमध्ये राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जुलै महिन्यात
राज्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि
विदर्भ भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या १०६
टक्के पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
जून महिन्यात काही भागांत पावसाची असमानता दिसून आली
होती, मात्र
जुलैमध्ये हवामान खात्याने पावसाचा संतुलित वितरणाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही बाब अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.