मुंबई , 9 सप्टेंबर : बिझनेसमन आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक ऑफेन्स विंग (ईओडब्ल्यू) ने त्यांना 60.48 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात समन्स पाठवले आहे. विभागाने त्यांना या महिन्याच्या 15 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी राज कुंद्रा यांना 10 सप्टेंबर रोजी हजर व्हायचं होतं, पण त्यांनी अधिक वेळ मागितला होता.दरम्यान, ईओडब्ल्यूने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर लुक आउट सर्क्युलर (एलओसी) सुद्धा जारी केला आहे, जेणेकरून ते देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात एनसीएलटी च्या ऑडिटरलाही समन्स बजावण्यात आले आहे.
या प्रकरणात जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाली आहे. तक्रारदार दीपक कोठारी, जे लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे डायरेक्टर आहेत, यांनी आरोप केला आहे की 2015 ते 2023 दरम्यान त्यांनी 60.48 कोटी रुपये शिल्पा-राज यांच्या ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत गुंतवले, व्यवसाय वाढवण्यासाठी. पण हे पैसे व्यवसायासाठी वापरण्याऐवजी शिल्पा आणि राज यांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरले, असा आरोप आहे.
दीपक कोठारी यांचे वकील जैन श्रॉफ म्हणाले की, त्यांच्या क्लायंटने संपूर्ण पुराव्यांसह गुंतवणूक केली होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर करून त्यांची फसवणूक केली आणि पैसे वैयक्तिक उपयोगासाठी वापरले. तर, शिल्पा शेट्टी यांचे वकील प्रशांत पाटील यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, तक्रारदार स्वतः या कंपनीत भागीदार होते, त्यांच्या मुलाला डायरेक्टर बनवले गेले होते आणि हे एक इक्विटी एग्रीमेंट होते. म्हणजेच, नफा-तोटा दोघांनाही वाटून घ्यावा लागतो. वैयक्तिक हमी संदर्भात ते म्हणाले की, असा काही दस्तऐवज असेल तर तो कोर्टात सादर केला जाईल, आणि त्यावरचा निर्णय कोर्टच घेईल.